पुणे (प्रतिनिधी) पत्नीने आपली खरी ओळख लपवून आपल्याला धोका दिल्यामुळे नवऱ्याने थेट कोर्टात धाव घेतली आहे. लग्न झाल्यानंतरही पत्नी शरीरसंबंधास नकार देत होती. तर दुसरीकडे संबंधित महिलेनं देखील आपला नवरा आणि सासऱ्याच्या मंडळीविरोधात छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी २३ वर्षीय युवतीचं ऑगस्ट २०२० मध्ये पुण्यातील एका तरुणासोबत लग्न झालं होतं. संबंधित तरुणाचा दुधाचा व्यवसाय आहे, तर युवती गृहीणी आहे. पण लग्न झाल्यानंतर त्याच्या दोघांत सर्व काही ठीक नव्हतं. लग्न झाल्यानंतरही पत्नी शरीरसंबंध करण्यास नेहमी नकार देत होती. पण नवीन घरात आली असल्याने तिला वेळ द्यायला पाहिजे, म्हणून पतीनेही तिला फार काही त्रास दिला नाही. पण लग्नानंतर तीन महिन्यांनी पत्नी माहेरी जावून आल्यानंतर पत्नीचं बिंग फुटलं आहे. तिच्या फोनमधील फोटो आणि चॅटींग वाचून नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
बायकोचं सत्य समजल्यानंतर नवऱ्याने थेट कोर्टात धाव घेतली आहे. नवऱ्याने कोर्टात केलेल्या दाव्यानुसार, संबंधित महिला ही समलैंगिक आहेत. तसेच फिर्यादीने महिलेच्या मोबाइलमध्ये अन्य एका तरुणीसोबत शरीरसंबंध करतानाचे फोटो पाहिले आहेत. त्यामुळे पत्नी समलैंगिक असेल तर विवाह कायदेशीर मानता येणार नाही. त्यामुळे लग्न रद्द करण्यासाठी संबंधित तरुणाने कौटुंबीक न्यायालयात धाव घेतली आहे.
दुसरीकडे, मात्र संबंधित महिलेनं आपला नवरा आणि सासऱ्याच्या मंडळीविरोधात छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. पैशांसाठी नवऱ्याने आणि सासरच्या कुटुंबीयांनी आपला छळ केल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या गुन्ह्यात कोर्टाने आरोपी नवऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.