नागपूर (वृत्तसंस्था) पत्नीसोबतच्या सततच्या वादाला कंटाळून धारदार शस्त्राने पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना दि. ३१ (मंगळवार) रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास टेकाडी गावात घडली. घटनेनंतर आरोपी पतीने स्वतःहून कन्हान पोलिसांत आत्मसमर्पण केले. दुलेश्वरी उर्फ कुसुम अमित भोयर (२८), असे मृतक पत्नीचे, तर आरोपी पतीचे नाव अमित नारायण भोयर (२९), असे आहे.
दीड वर्षा पूर्वीच प्रेमविवाह !
अमित भोयर यांचा कामठी येथील दुलेश्वरी रामकृष्ण देवगडे हिच्यासोबत २०२२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मित्रांबरोबरीला गेलेल्या सहलीत दोघांची ओळख झाली होती. दुलेश्वरीच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध असल्याने तिने अमितसोबत पळून जाऊन नागपूर येथे एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर अमित ह्याने दुलेश्वरीला टेकाडी येथे राहत्या घरी आणून आपल्या कुटुंबाची समजूत काढून ५ मार्च २०२३ रोजी थाटात लग्न केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर घरघुती कारणामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. क्षुल्लक कारणावरूनही भांडण असल्यामुळे अमित काही महिन्यांपासून मानसिक त्रासात होता, असे कळते.
मान व पोटावर केले वार !
मंगळवारी सकाळी त्या दोघांमध्ये झालेले भांडण विकोपास गेले आणि अमितने किचनमधील सज्जावर ठेवलेला चाकू काढून तिच्या मान व पोटावर वार केले. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच ठाणेदार सार्थक नेहेते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. दुसरीकडे आपल्या हातून चूक झाल्याचे लक्षात येताच अमित पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना पत्नीला जिवानिशी मारल्याची कबुली दिली.
पैशांसाठी मुलाला त्रास, पित्याची तक्रार !
घटनेनंतर मृतक दुलेश्वरीचे वडील रामकृष्ण शालिकराम देवगडे यांनी आरोपी अमित हा पैशांकरिता मुलीला त्रास देत असल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली. त्यानुसार नवीन पिकअप वाहन घेण्यासाठी ३० हजार रुपये मुलगी दुलेश्वरीने माहेरून नेले होते. आरोपीला अधिक पैशाची गरज असल्याने पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. त्यातूनच आपल्या मुलीची हत्या केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. आरोपी व मृतकाच्या पश्चात सात महिन्यांची मुलगी आहे. आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२, कलम ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
सात महिन्यांची आद्या झाली पोरकी !
डुलेश्वरी व अमित यांना नऊ महिन्यांची आद्या नावाची मुलगी आहे. आई व वडिलांच्या भांडणात ती मात्र आईला पोरकी झाली आहे. आईच्या हत्येनंतर पोलिसांनी आद्याला तिचे आजोबा (आईचे वडील) रामकृष्ण देवगडे, रा. रनाळा, ता. कामठी यांच्या सुपूर्द केले. विशेष म्हणजे, आ अधूनमधून आईवडिलांविना तिच्या आजोबांकडे राहायची.