मुंबई प्रतिनिधी । इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत राज्यातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक पार पडली. हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतो. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचं मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला आदित्य ठाकरेंसह पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या एकाच छताखाली मिळतील यादृष्टीने वेबपोर्टल तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीवेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर–सिंह यांनी सादरीकरण केले. हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला कोणकोणत्या विभागाच्या परवानग्या लागतात, त्यातील कोणत्या आवश्यक नसलेल्या परवानग्यांची संख्या कमी करता येईल याबाबत माहिती दिली. कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राला निश्चितच चांगले दिवस येतील. याअनुषंगाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभाग विविध निर्णय घेत आहे. कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरणही तयार होत आहे. खासगी- सार्वजनिक सहभागातून काही प्रमुख पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.