नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील रतलाम येथे पाच दिवसांपूर्वी लालसिंह हा शेतकरी बॉम्बस्फोटात ठार झाला होता. पोलिसांनी या घटनेचा सखाेल तपास केला. तर धक्कादायक माहिती समाेर आली असून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेशने पत्नीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा बदला घेण्यासाठी लालसिंगला स्फोटकांनी उडवले.
रतलाम पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, मृत लाल सिंह, माजी सरपंच भंवरलाल आणि दिनेश या तिघांना सुरेशच्या पत्नीवर एक वर्षापूर्वी बलात्कार केल्याचा आरोप होता. पोलिसात तक्रार केल्यास सुरेश आणि त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. अपमानाचा बदला घेण्यासाठी सुरेशने तिघांचाही काटा काढायचे ठरवले. ६ महिन्यांपूर्वी त्याने भंवरलालला मारण्याचा प्रयत्न केला. सुरेशने तिघांनाही जिलेटिन रॉड आणि डिटोनेटर वापरून ट्यूबवेलच्या स्टार्टरला जोडले होते. स्फोटही झाला; पण भंवरलाल थोडक्यात वाचला हाेता.
या घटनेच्या सहा महिन्यांनंतर मागील आठवड्यात, सुरेश लोढा याने आणखी स्फोटके गोळा करून पुन्हा स्फोट घडवून आणला. या स्फोटात लालसिंगचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशने यावेळी १४ जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवून आणला. ४ जानेवारीच्या रात्री त्यांनी लालसिंग यांच्या शेतात जाऊन कुदळाच्या सहाय्याने माती खणली आणि १४ रॉड आणि डिटोनेटर कूपनलिकेच्या स्टार्टरला जोडले. लाल सिंग सकाळी त्यांच्या शेतात पोहोचला आणि त्यांनी स्टार्टरचे बटण दाबताच मोठा स्फोट झाला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे प्रकरण जिलेटिनच्या कांड्या आणि स्फोटाशी संबंधित होते, म्हणून ‘एसआयटी’कडे तपास देण्यात आला. एसआयटी टीमला सुरेश लोढा यांच्या पत्नीवर झालेल्या बलात्काराची माहिती समोर आली. गावातील लोकांनी असेही सांगितले की, सुरेश लोढा हे घटनेच्या दिवसापासून कुटुंबासह बाहेर गेले आहेत. सायबर सेलच्या मदतीने त्यांचा फोन ट्रेस केला असता तो मंदसौरमध्ये असल्याचे समजले. त्याला मंदसौरमध्ये पकडण्यात आले होते, पोलिसांच्या चौकशीत सुरेश लोढा याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.