सोलापूर (वृत्तसंस्था) मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला काहीही अडचण येत नाही. ज्या काही राजकीय गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या आहेत मात्र शिक्षण खाते चालवत असताना राज्यपालांशी संबंध येत असतो. त्यांचे आणि माझे संबंध चांगले आहेत, असं मत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. उदय सामंत आणि राज्यपाल यांच्यात अंतिम वर्षांच्या परीक्षांवरुन मोठा वाद रंगला होता. त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांचं भाष्य महत्त्वाचं आहे.
एकीकडे राज्यसरकार आणि राज्यपाल यांच्यात जणू संघर्ष असल्यासाऱखे प्रसंग घडत असताना उच्च आणि शिक्षणमंत्री यांनी सोलापुरात हे मत व्यक्त केले आहे. उदय सामंत म्हणाले, ” माझा राज्यपालांशी कायम संपर्क असतो. मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला काहीही अडचण येत नाही. राजकीय ज्या काही गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या, मात्र हे खाते चालवत असताना राज्यपालांशी संपर्क येत असतो. माझा वर्षभराचा कार्यकाळ पहिला तर लक्षात येईल माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत” आठ दिवसांपूर्वी मी राज्यपाल महोदयांशी अनेक विषयांवर चर्चा करुन आलो. राजकीय जे काही कार्यक्रम होत आहेत किंवा राजकीय ज्या काही गोष्टी होत आहेत, त्या वेगळ्या आहेत. परंतु हे खातं चालवत असताना राज्यपाल महोदयांकडे मला जावं लागतं. त्यांना भेटावं लागतं, असंही उदय सामंत यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं. कुलपती म्हणून काही कामकाजही राज्यपालांसोबत करावं लागतं, असंही सामंत पुढे म्हणाले. आपण वर्षभराचा आलेख जर बघितला तर माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत, असं सांगायलाही उदय सामंत विसरले नाहीत.
राज्यपाल भगत कोश्यारी यांच्याशी शिक्षणमंत्री म्हणून आपले कसे संबंध आहेत असा प्रश्न पत्रकारांनी सामंत यांना विचारला होता त्यावर बोलताना सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान विमानाच्या मुद्यावरुन झालेल्या वादावर बोलताना सामंत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका देखील केली. ‘राज्य सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष नाहीये. नियमांचा काही मुद्दा असेल. या नियमांची मला माहिती नाही. मात्र सर्वजण नियमाने वागतील. राज्यपाल देखील नियमानुसार १२ आमदारांच्या नावाच्या शिफारसीवर सही करतील’, अशी अप्रत्यक्ष टीका उदय सामंत यांनी केली.
विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनशी चर्चा करून विद्यापीठाने निर्णय घ्यावा. संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू निर्णय घेतील. १५ तारखेपासून महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कॉलेजमध्ये ५० टक्के उपस्थिती असली पाहिजे. मात्र कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे, असं उदय सामंत यांनी नमूद केलं.