नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत भेट झाली नाही. ही काही राजकीय भेट नव्हती. पण माझे त्यांच्यासोबत चांगले संबंध आहे. मी काय नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो’ असा ठाकरे स्टाईल उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आल्यानंतर महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन मुद्देसुदपणे माहिती दिली.
यावेळी, पंतप्रधानांसोबत तुमची व्यक्तिगत भेट झाली का, अशा प्रश्नांचा भडीमार पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केला. उद्धव ठाकरे यांना मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी ही गोष्ट कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही, पण याचा अर्थ नातं तुटलं असा नाही. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचं नाही. मी काही नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो. माझ्या सहकाऱ्यांना मी पुन्ह जाऊन त्यांना भेटायचं असेल असं सांगितलं तर त्यात चुकीचं काय?,” अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
“मधल्या काळात त्यांचा फोन आला आणि सरकार चांगलं काम करत आहे सांगितलं हे व्यक्तिगत बोलणच होतं. आजही आमची वैयक्तिक भेट झाली. यावेळी त्यांनी विचारपूस केली. मी त्यांना सहकाऱ्यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न आहेत असं सांगितलं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. युती का तुटली ? असं विचारलं असता दीड वर्षाने त्यावर उत्तर का द्यावं असं ते म्हणाले.