पुणे (वृत्तसंस्था) आज बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. त्यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही एक-दोन नगरसेवकावरुन थेट ५१ वर गेलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई लढणार, असं आव्हान पाटील यांनी दिलंय.
बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपनं एकहाती वर्चस्व मिळवल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘ज्या ज्या वेळेला रिझल्ट चांगले असतात, त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या आणि विरोधकांच्या स्वभावानुसारच आहे’, असा टोला पाटील यांनी लगावला.
सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केलं जात आहे की बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत पाटील यांना विचारलं असता, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही ५१ वर गेलो. तेव्हा आम्ही म्हणलं की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असं थेट आव्हानच पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसंच बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचं पाटील यांनी आवर्जुन सांगितलं.