जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका अल्पवयीन (Minor) बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून (Suicide Note) स्वतःच्या खिशात ठेवली. ही चिठ्ठी जेव्हा घरच्यांनी वाचली, तेव्हा सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आणि सर्वांनाच जबर धक्का बसला. पोलिसांनी या गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.
राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका अल्पवयीन तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलीचे वडील बाडमेरमध्ये मजुरी करत होते आणि मुलीच्या शिक्षणासाठी पैसे कमावत होते. गेल्या काही वर्षांपासून या भागात भाड्याच्या घरात राहून मुलांच्या शिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं होतं. अल्पवयीन तरुणी शाळेत येत-जात असताना परिसरातील एका आरोपीची तिच्यावर नजर होती. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपीने तरुणीला पकडून स्वतःच्या घरात नेलं आणि तिथं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याच्यासोबत त्याचा मित्रदेखील यात सहभागी होता. दोघांनी तरुणीवर अत्याचार केले आणि तिचे अश्लिल फोटो काढले. या प्रकाराची वाच्यता केली, तर बदनामी करण्याची धमकी या दोघांनी तिला दिली होती. या घटनेनंतर प्रचंड दबावाखाली असलेल्या या तरुणीनं स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत गळफास घेतला.
खिशात ठेवली चिठ्ठी
गळफास घेण्यापूर्वी आपल्याबाबत जे जे घडलं ते तिनं एका चिठ्ठीवर लिहिलं आणि ती चिट्ठी स्वतःच्या खिशात ठेवली. लेकीनं आत्महत्या केल्याचं समजल्यावर शोकमग्न झालेले तिचे वडील आणि कुटुंबीय तिचा मृतदेह मूळ गावी घेऊन गेले. त्यावेळी घरमालकानं पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेवढ्यात काही महिलांना मुलीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. ती त्यांनी मुलीच्या वडिलांकडे दिली. महेंद्र सिंह आणि एका अल्पवयीन मुलाने रविवारी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे आणि कोणालाही सांगितल्यास कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. मुलीकडे एक पानाची सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये “मी मरणार आहे, माझ्या सर्व वस्तू कोणालाही देऊ नका, मला मरायचे नाही, पण काय करू? लोक माझ्या वडिलांना ऐकवतील. माझी स्वप्ने अजूनही अपूर्ण आहेत. महेंद्र आणि त्याच्या मित्राने खोटं बोलून बाहेर बोलावलं आणि माझी बदनामी झाली ” असं म्हटलं आहे.
“पापा मला माफ करा, मी काही चुकीचं केलं नाही”
“माझ्या आई आणि वडिलांना कोणी काही बोलू नका. पापा मला माफ करा आणि माझे कपडे आणि सर्वकाही योग्य ठिकाणी ठेवा. मी काही चुकीचे केले नाही… तुमची मुलगी… माझ्या मृत्यूचे कारण महेंद्र आणि त्याचा मित्र आहे” असं देखील म्हटलं आहे. सुसाईड नोट सापडल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. जिथे पोलिसांनी हा सामूहिक बलात्कार मानून पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला कक्षाचे एएसपी हजारीराम करत आहेत. सध्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.