मुंबई (वृत्तसंस्था) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी एटीएस करत आहे, तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली. त्यानंतर ‘सचिन वाझे यांना गृहमंत्रीच पाठीशी घालत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच, मी फोनचा सीडीआर मिळवला आहे, माझी खुशाल चौकशी करा, असं चॅलेंजच फडणवीस यांनी दिले.
आम्ही धमक्यांना घाबरत नाही. आमची चौकशी करा असं म्हणत फडणवीसांनी सरकारवर संताप व्यक्त केला. फडणवीस यांनी अन्वय नाईक केस दाबली, त्याची चौकशी करायची आहे आम्हांला असं अनिल देशमुख यांनी म्हटलं. त्यानंतर, ‘माझं तुम्हाला खुलं आवाहन आहे. माझी चौकशी करा. कर नाही त्याला डर कसला, असं देखील फडणवीसांनी म्हटलं. मनसुख हिरेन प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन सादर केले. यावेळी, ‘मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावर खुलासा करत गृहराज्यमंत्री प्रफुल्ल खेडा पटेल यांचा नावाचा उल्लेख केला. या प्रकरणी एसआयटी स्थापन करत असल्याची घोषणा देशमुख यांनी केली. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे, जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं सांगितले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. ‘एखाद्या व्यक्तीला किती मागे घालावे. सचिन वझे यांचा राजीनामा नाही. वाझे कोणत्या पक्षाचे आहेत ? वाझेला निलंबित करा. कारवाई करणे नाही म्हणजे वाझेंना पुरावे नष्ट करण्याची मुभा देण्यासारखे आहे. वाझे यांना निलंबित करा, हा खरा चेहरा दिसतोय’, असा आरोप फडणवीस यांनी केला.
‘कोणत्याही पक्षाचा गुन्हेगार नसतो, वाझेला पहिले निलंबित करा. हायकोर्टाचा आदेशाने वाझे निलंबित झाले, आम्ही आमचा सरकारने त्यांना सेवेत घेतले नव्हतं, यांच्या एका पुनर्विचार समितीने त्यांना घेतलं’, असंही फडणवीस म्हणाले. ‘मुळात या प्रकरणात कोणतीही याचिका दाखल केली नाही. त्यामुळे न्यायप्रविष्ट नाही. यांना अभिमान वाटतो की लोकं इथे येऊन आत्महत्या करतात. पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं. इतके पुरावे देऊन काही कारवाई होत नसेल मग आम्हाला तुमच्यावर संशय आहे’, असा आरोपच फडणवीस यांनी केला.
‘विरोधी पक्षाकडे सीडीआर कुठून आणलं, त्यांना काय अधिकार आहे, विरोधी पक्षनेत्यांना सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल नाना पटोले यांनी केला. ‘होय, मी सीडीआर मिळवला माझी चौकशी करा, पण जे खुनी आहेत त्यांची चौकशी करा. आम्हाला धमक्या देतायंत का? खुनी मिळाला नाही तर त्या पलीकडचीही माहिती काढेल’, असं आव्हानच फडणवीस यांनी दिले. हे सरकार खुनी आहे असं म्हणत भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर सत्ताधारी आमदारही वेलमध्ये उतरले आणि त्यांनीही गोंधळ घातला.
मनसुख हिरेन यांच्या पत्नीनं पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचं हिरेन यांच्या पत्नीनं एफआरआरमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.