नाशिक (वृत्तसंस्था) मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. तुमच मन खंबीर असल तर कोरोना होणार नाही असं सांगत इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या कीर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्याची चर्चा राज्यभर होत आहे. इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे. दरम्यान, निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वक्तव्याने आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाकाळात महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचं आवाहन केलं होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर यांनी एक लाखांची मदत दिली होती. लॉकडाउनमुळे रोज हातावर पोट असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले होते.