मुंबई (वृत्तसंस्था) मृत्यूशी मला मैत्री करायची आहे, अशा प्रकराचे वाक्य लिहून आठवीच्या वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्या हरिश्चंद्र मानकर असे मृत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र मानकर हे व्हिएनआयटी महाविद्यालायात नोकरीवर आहेत. ते पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह चंद्रमणीनगरात राहतात. मुलगा MSC तर मुलगी बारावीत आहे. लहान मुलगी आर्या ही माऊंट कारमेलमध्ये आठवीची विद्यार्थिनी होती. आर्या अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिला डायरी लिहिण्याची सवय होती. गेल्या काही महिन्यांपासून ती अबोल झाली होती. ती सारखी वहीमध्ये मृत्यूसंदर्भात अनेक विचारवंताचं सुभाषित लिहित होती. त्यासाठी आर्याने तीन वह्या तयार केल्या होत्या. त्यामध्ये तिने मृत्यूवर कविता लिहिली होती.
मृत्यूवर लिहिली कविता
मृत्यू किती सुंदर आहे…यावर तिने आपले विचार मांडले होते. ‘जर कोरोना पुन्हा आला..तर मला मरायला आवडेल…’ असा उल्लेख तिने वहीत केला होता. सोमवारी सकाळी वडील नोकरीवर गेले तर आई स्वयंपाक करीत होती. बहिण ट्युशनला गेली होती. यावेळी आर्याने अभ्यासाच्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. आई जेवायला आवाज देण्यासाठी खोलीत गेली असता तिला धक्का बसला. आईने हंबरडा फोडल्यानंतर शेजारी गोळा झाले. याप्रकरणी अजनीच्या सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी माहोरे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.