मुंबई (वृत्तसंस्था) काही लोकांनी मला उद्घाटनासाठी बोलावलं. तुम्ही मला २०२१, २०२२ एवढंच काय २०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावलं तर मी नाही कसं म्हणणार? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात विचारला. त्यानंतर ते म्हणाले की विनोदाचा भाग सोडून द्या पण महाराष्ट्र सरकार उद्योजकांच्या मागे ठामपणे उभं राहिल असा विश्वास या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
“काही लोकांनी मला उद्घाटनाला बोलावलं, तुम्ही मला २०२१, २०२२ आणि २०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावलं तर मी कसं नाही म्हणणार?”, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली. “हा एक विनोदाचा भाग झाला. मात्र, महाराष्ट्र सरकार नेहमी गुंतवणुकदार आणि उद्योजकांसोबत खंबीरपणे उभं राहील, असा मी विश्वास देतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते मॅगनेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक अधिकारी आणि गुंतवणुकदार उपस्थित होते. आमचं सरकार हे तीन पक्षांचं आहे. या सरकारमध्ये मती, गती आणि प्रगती असे तिन्ही गुण आहेत. त्यामुळे उद्योजकांनी निश्चिंत रहावं आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. “मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे मॅग्नेटिक पॉवर आहेच. पण ही पॉवर कसली आहे कशामुळे हा शब्द वापरला तर ती पॉवर तुम्ही आहात. घराघरात लक्ष्मी जाते तेव्हा घरातले लोक कसे आहेत तेच बघते. घरातले सदस्य समाधानी आहेत का? की आपसात लढत आहेत हे पाहत असते. घरात समाधानी वातावरण असेल तरच लक्ष्मी येते. तुम्ही सगळे उद्योजक म्हणजे आमच्या घरातलेच लोक आहात. जिथे घरात ताकद मिळते तिथे साहजिकच विदेशातील ताकद येणारच. घरात येणारी ताकद म्हणजे जणू हत्तीचं बळच” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उद्योग विभागाने एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचं उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल सुभाष देसाई आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन. मी त्यावेळी १ लाख कोटींचं उद्दीष्ट दिलं होतं. समाधान आणि अभिमान वाटेल असाच हा क्षण आहे. उद्योग मित्र ही संकल्पना छान आहे. देशाच्या प्रगतीची धारणा महत्त्वाची. काम म्हणजे काम हे जेव्हा आपल्या अंगी भिनेल तेव्हा महाराष्ट्र प्रगती करेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
“काम म्हणजे काम हे आपल्या अंगात भिनतं तेव्हा जी मॅगनेटिक ताकद आहे ती त्यामध्ये येते. महाराष्ट्रातील गुंतवणूक बाहेर घेऊन जाणं सोपं नाही. गुंतवणुकदाराचं महाराष्ट्रासोबत एक कौटुंबिक नातं निर्माण होतं. ते नातं मजबूत असतं. हे कुटुंब तुटू शकत नाही. माझ्या महाराष्ट्रातून कुणीही बाहेर जाऊ शकत नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला