चंदिगढ (वृत्तसंस्था) कृषी कायद्याविरोधात १८ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता पंजाब पोलिसही आले आहेत. DIG लखमिंदर सिंह जाखड यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ADGP पीके सिन्हा यांनी राजीनाम्याची प्रत मिळाल्याची पुष्टी केली आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना पंजाबच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. लखविंदरसिंह जाखड असे या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून ते पंजाबचे पोलिस उपमहानिरीक्षक आहेत. आपण शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे सांगत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांना समर्थन देत त्यांनी आपला राजीनामा राज्याच्या प्रधान सचिवांकडे (गृह) सुपूर्द केला आहे. लखमिंदर यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले की, राज्यातील शेतकरी संकटात आहेत. थंडीत आभाळाखाली रस्त्यावर आंदोलन करत आहेत. मी स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. यामुळे मला या आंदोलनाचा भाग व्हायचे आहे. त्यामुळे मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करा, जेणेकरून दिल्लीत जाऊन आपल्या शेतकरी बांधवांसोबत आपल्या हक्कासाठी लढा देऊ शकेल. याआधी पंजाबच्या अनेक दिग्गजांनी शेतकऱ्यांचे समर्थन करत आपले पुरस्कार परत केले आहेत. माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्म विभूषण पुरस्कार परत करून याची सुरुवात केली होती. यानंतर राज्यसभा खासदार सुखदेव सिंह ढींढसा यांनी पद्मभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा केली.