पुणे (वृत्तसंस्था) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचा आरोप केला आहे. लोणावळ्यात बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना टाळलं असून त्यांच्यासारख्या लहान माणसावर बोलणार नाही असं म्हटलं आहे. बारामती येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवार यांनी बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी पटोले यांना थेट त्यांची जागाच दाखवली. या गोष्टीत मी काही पडत नाहीत. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले. पवारांच्या या खोचक टीकेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
पटोले काय म्हणाले होते?
पटोले लोणावळ्यात होते. एका मेळाव्याला संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं, असं सांगतानाच आपण काहीच बोलायचं नाही. पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर लढायचं म्हणालो. यावर माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा, असं पटोले म्हणाले होते.