चंदीगड (वृत्तसंस्था) सर्वसामान्यांना लस उपलब्ध झाल्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतली. याशिवाय काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही लस घेतली आहे. असं असताना हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी मात्र कोरोना लस घेण्यास नकार दिला आहे. तसंच यामागचं नेमकं कारण देखील त्यांनी स्पष्ट केल आहे.
अनिल वीज हे कोरोना लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी झाले होते. ट्रायलमध्ये त्यांनी कोरोना लस घेतली होती. पण आता जेव्हा प्रत्यक्षात लसीकरण सुरू झालं आहे, तेव्हा मात्र त्यांनी लस घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामागचं नेमकं कारण देखील त्यांनी स्पष्ट केल आहे. अनिल वीज यांनी ट्वीट करून आपण लस का घेणार नाही, याचं कारण दिलं आहे. ते म्हणाले, आज सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. निसंकोचपणे लस घ्या. मला लस घेता येणार नाही कारण कोरोना इन्फेक्शन झाल्यानंतर माझ्या शरीरातील अँटिबॉडी ३०० झाल्या आहेत आणि या भरपूर आहेत. कदाचित ट्रायलमध्ये मी लस घेतली त्यामुळे माझ्या शरीरातील अँटिबॉडी वाढल्या असाव्यात. आता मला लस घेण्याची गरज नाही.
अनिल वीज यांनी नोव्हेंबरमध्ये कोवॅक्सिन लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू असताना त्यात सहभागी होऊन लस घेतली होती. त्यांनतर डिसेंबरमध्ये त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झाले आणि त्यानंतर कोरोना लस घेतल्यामुळे त्यांना कोरोना झाला अशा चर्चा सुरू झाल्या. अनिल वीज यांनी आपण कोरोना लशीचा एकच डोस घेतला, दुसरा डोस घेणं बाकी आहे, असं स्पष्टही केलं होतं आणि आता त्यांनी आपल्यावर झालेला लशीचा परिणाम सांगत न घाबरता लस घेण्याचं आवाहनही केलं आहे.
दरम्यान सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेतली. त्यापाठोपाठ आता दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही कोरोना लस घेतली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्वतः लस घेऊन आवाहन केलं. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील कोरोनाची लस टोचून घेतली. “बिहारमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मोफस दिली जाईल.” सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा कोरोना लसीकरणाची सुविधा बिहार राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून दिली असल्याचं नितीन कुमार यांनी सांगितलं.
मोदींनी लस घेतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले असून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे. मास्क लावण्य़ाची आठवण करून देण्यासाठी काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा फोटो शेअर केला आहे. बायडन यांनी लस घेताना मास्क लावलेला फोटोही पोस्ट करत टोला लगावला आहे.