बुलडाणा (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीतील मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नितीन गडकरी यांच्या विषयी एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. बच्चू कडू बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते, यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी नितीन गडकरींचं तोंडभरुन कौतुक केलं. नितीन गडकरी पंतप्रधान असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यातील फरक सांगताना म्हटलं की, “मोदी पंतप्रधान झाल्याने मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला. पण गडकरी चांगले व्यक्ती असून ते पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता”. बच्चू कडू यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “ज्यावेळी मोदींनी १०० रुपयांत गॅस वाटला त्यावेळी ४०० रुपयांत सिलेंडर मिळत होते. आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली आहे,” अशी टीका बच्चू कडूंनी केली.