साकळी ता. यावल (प्रतिनिधी) न्हावी ता. यावल येथील नाथ मंदिरात (विठ्ठल मंदिर) त्रिपुरारी पौर्णिमा काकडा आरती कार्तिक मास समाप्ती च्या निमित्ताने ह. भ. प. दीपक महाराज शेळगावकर यांची कीर्तन सेवा पार पडली. या सेवेत त्यांनी तुकाराम महाराजांच्या काला प्रकरणातला अभंग घेतला असून त्यांनी अभंगाचे निरुपण करताना सांगितले.
मनुष्याने स्वतःतील अभिमान काढून विनम्र भावाने शरण गेल्यास सहज ईश्वर प्राप्ती होऊ शकते. असे प्रतिपादन ह. भ. प. दीपक महाराज यांनी येथील विठ्ठल मंदिरात केले. एवढेच नाही तर श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे वर्णन त्यांनी केले. त्रिपुरारी पौर्णिमा काकडा आरती कार्तिक मास समाप्ती च्या निमित्त ह. भ. प. दीपक महाराज शेळगावकर यांची कीर्तन सेवा श्रीनाथ मंदिरात पार पडली. अभंग संत श्री तुकाराम महाराज यांचा काला प्रकरणातला असून या अभंगातून तुकोबाराय म्हणतात की ब्रम्हादिकांना सुद्धा भगवंताच्या रूपाचे आकलन झालेले नाही. जगातील सर्वात शहाणा म्हटला गेलेला वेद असो अथवा सहस्र मुखाचा शेष यांनासुद्धा भगवंताच्या स्वरूपाचे पूर्णतः आकलन झालेले नसल्याचे कीर्तनातून त्यांनी प्रतिपादन केले. काकडा आरती चे महात्म्य सांगत असताना काकडा आरतीच्या दर्शनाने जीवाच्या सकळ पापांचा सहज नाश होतोच असल्याचे त्यांनी सांगितले. संसार रुपी निद्रेतून बाहेर पडून आत्म उद्धाराच्या दृष्टीने प्रयत्न करण्याकरिता पहाटेच्या वेळी काकड आरतीचे प्रयोजन वारकरी संप्रदायात असल्याचे महाराज यांनी स्पष्ट केले. आत्म कल्याणाच्या बाबतीत जागृत असलेल्या संतांनी जगाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याकरिता काकड आरती ची रचना वारकरी संप्रदायात झाली असल्याचे स्पष्ट केले. काकड आरती ही भक्तीतून ज्ञानाकडे जाण्याचा आनंद मार्ग असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. “असो नसो भाव आलो तुझिया ठाया कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया” काकड आरती निमित्ताने म्हणावयाच्या या पदातून सर्व प्रकारचा अभिमान काढून देवासमोर विनम्र भावाने शरण गेल्याने ईश्वरप्राप्ती सहज होत असते असे संत विचारांचे प्रतिपादन ह. भ. प. दीपक महाराज यांनी केले. श्रीकृष्ण परमात्म्याच्या गोकुळातील लीलांचे वर्णन काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने करत असताना तुकाराम महाराज म्हणतात की श्रीकृष्ण हा मोहरी पावा आणि हातात काठी घेऊन गाईंच्या मागे धावतो. गोकुळातील श्रीकृष्णाचे चरित्र हे उच्चारनिय असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकृष्ण चरित्राचा उच्चार केल्यानंतर जारपुत्र म्हटल्या गेलेल्या व्यासांना सुद्धा जगद्गुरु ही उपाधी प्राप्त होते. राम आणि कृष्ण या दोन्ही अवतारातील फरक स्पष्ट करत असताना कृष्ण अवतारातील काला या विशेष प्रसंगाचे महात्म्य काल्याच्या कीर्तनातून महाराज यांनी व्यक्त केले. काल्याच्या प्रसंगी प्राप्त होत असलेला प्रसाद हा भाग्यवान असलेल्या गोपालांना खऱ्या अर्थाने प्राप्त झाला. देवादिकांना सुद्धा दुर्लभ असलेला हा काला मात्र वारकरी सांप्रदायिक संतांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पांडुरंगाच्या समवेत केल्याचे वर्णन महाराजांनी कीर्तनातून केले.
” एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी” या पद्धतीने दिला जाणारा काला हा खऱ्या अर्थाने समभावाचे प्रतीक असल्याचे महाराजांनी कीर्तनातून सांगितले. आपल्या जवळील जे जे उत्कृष्ट आहे ते आधी देवाला द्यावे अशा प्रकारची भूमिका गोपाळांची असल्यामुळे देव खऱ्या अर्थाने गोपाळ भक्तांना कळाला. काला कीर्तनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या मख्खनधारी, शंखपुष्पधारी, चक्रगदाधारी, गोवर्धन धारी, मुरली धारी, गीता धारी, अशा विविध रूपांच वर्णन भक्ती भावपूर्ण सुमधुर पद्धतीने कीर्तनातून करण्यात आले. कीर्तन सेवेला गावातील सर्व हभप भजनी मंडळाचे सहकार्य लाभले. किर्तनाच्या सुरुवातीलाच रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी ह. भ. प. दीपक महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सोबत संस्थाध्यक्ष अनिल चौधरी, सचिव विलास भोगे व भारत विद्यालयाचे उपाध्यक्ष अनिल लढे उपस्थित होते.