मुंबई (वृत्तसंस्था) परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांचं दापोली तालुक्यातील मुरूड इथलं रिसॉर्ट बेकायदा असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याचसंदर्भात किरीट सोमय्या आज कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा असं आव्हान परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना दिलं आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, हा रिसॉर्ट माझा नाहीये. ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. किरीट सोमयया पालिकेचे नोकर आहेत का…? किरीट सोमयाय वातावरण खराब करत आहेत. जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे. मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार, किरीट सोमय्या तोडायला कर्मचारी आहेत का? हिंमत असेल तर तोडून दाखवा.
हिंमत असेल तर तोडून दाखवा
अनिल परब यांनी पुढे म्हटलं, हिंमत असेल तर तोडून दाखवा. ते फक्त नौटंकी करत आहेत. हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले आहे. हे कोण ठरवणार रिसॉर्ट बेकायदेशीर आहे ते? जर कुठल्या कायद्याचा भांग झालेला आहे तर संबधित विभाग कारवाई करेल. माझे नाव मुद्दाम घेऊन वातावरण खराब करत आहेत. कोकणात ज्यांचे पाण्यात बंगले आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी. किरीट सोमय्या नौटंकी करत आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे ते वातावरण खराब करत आहेत. ग्रामस्थांचा मला देखील फोन आला, आम्ही विरोध करू म्हणून. पण मी म्हणालो तो तुमचा प्रश्न आहे. जर त्यांच्या व्यवसायावर किरीट सोमय्या जात असतील तर ते विरोध करणारच ना? असंंही अनिल परब म्हणाले.
पोलिसांची नोटीस स्वीकारण्यास किरीट सोमय्या यांचा नकार
याच दरम्यान दापोलीकडे निघालेल्या किरीट सोमय्या यांना कशेडी घाटात पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी यावेळी 149 ची नोटीस देण्याचा प्रयत्न केला मात्र, ही नोटीस स्वीकारण्यास किरीट सोमय्या यांनी नकार दिला आहे.