पुणे (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना “हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपशी दोन हात करा, तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावं” असं खुलं आव्हान दिलं. पुण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
शहा म्हणाले, “पुणे ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. त्यांनी म्हटलं होतं की, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण शिवसेना म्हणते सत्ता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही ती मिळवणारच. आता एकवेळ तुम्ही मुख्यमंत्री बनलात. पण मी आजही म्हणतो जर हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि भाजपशी दोन हात करा. तुम्ही तिनही पक्ष एकसाथ लढायला या भाजपचा कार्यकर्ता तयारच बसलाय. महाराष्ट्राची जनता देखील हिशोब करायला तयारच आहे. अशा प्रकारचं सिद्धांतरहित राजकारण कोणत्याही राज्याच्या जनतेला मान्य नाही”
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालानं व्हायला हवी. लक्ष्य कधी कमी ठेऊ नका मित्रांनो. मी ऐकत होतो कोणी १०० तर कोणी १२० नगरसेवक असं म्हणतं होतं. पण जनता तुम्हाला जास्त नगरसेवक द्यायला बसली आहे, त्यामुळं मागण्यात कंजुषी करु नका. पुण्याची जनता फुलानं तुमचं स्वागत करायला तयार आहे. परिश्रम करा हे आपोआप होईल, अशा शब्दांत त्यांनी पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.