धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळू चोरी वाहतूक करणाऱ्यांवर धरणगाव महसूल पथकाने ७ डिसेंबर रोजी पहाटे १.५५ वाजता कारवाई केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाळू चोरी वाहतूक करणाऱ्यांवर धरणगाव महसूल पथकाने ७ डिसेंबर रोजी पहाटे १.५५ वाजता कारवाई केली. त्यानंतर महसूल पथकाने वाळूने भरलेले हे ३ ट्रॅक्टर जप्त करून पाळधी पोलीस ठाण्यात पहाटे २.५७ वाजता जमा करण्यात आले. या वेळी बांभोरी प्र.चा. येथील ट्रॅक्टर चालक संतोष उत्तम नन्नवरे, दिनेश भागवत नन्नवरे, रवींद्र जंगलु कोळी यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या आदेशाने अवैध वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी पथक तयार करण्यात आले होते.
या पथकामध्ये नायब तहसीलदार संदीप मोरे, मंडळ अधिकारी भरत पारधी, हेमंत महाजन, लक्ष्मीकांत बाविस्कर, सुनील पानपाटील तसेच तलाठी डी. एस. पाटील, हर्षल थाटे, अनिकेत खाडे, मोहन चौगुले, निखिल महाजन यांचा समावेश होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागातर्फे आव्हाणे शिवारातील गिरणा पात्रातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुन्हा, आज बांभोरी येथील तीन जणांवर गुन्हा दाखल झाल्याने अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.