धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसिलदार नितीन कुमार देवरे हे महिला तलाठी यांना दालनात बोलवून अपमानकारक भाषेत बोलून छळ करीत आहे. त्यामुळे त्यांची लवकरात लवकर हकालपट्टी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महिला व बालकल्याण समिती तथा जिल्हा परिषद सदस्या माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, धरणगाव तालुक्याचे तहसिलदार हे रुजू झाल्यापासून आपली मनमानी व हुकुमशाही कारभाराने संपूर्ण धरणगाव तालुक्यातील गोरगरीब लोकांना व तलाठयांवर बेकायदेशीर कारवाई व वागणूक करीत आहेत. हे सगळ मला समजले असता दि. १२ एप्रिल २०२१ रोजी समक्ष तक्रार केली होती. तरी त्यावर मला काही खुलासा मिळाला नाही.
सदर तहसिलदार साहेब हे महिला तलाठी (संपूर्ण धरणगाव तालुका) यांनी दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी मला निवेदन दिलेले आहे. तरी माझ्या माहिती प्रमाणे तहसिलदार हे महिला तलाठी यांना आपल्या दालनात बोलवून त्यांना तुम्ही बोगस धंदे करतात. नुसत्या पर्स घेवून फिरत राहतात. काम करण्याची बोंब पाडत नाही. नुसत थोबाड घेवून फिरतात अश्या अपमानकारक भाषेत बोलून वेळोवेळी छळ करणे चालू आहे. मी सुध्दा एक महिला असून मला महिलांच्या तळमळीची जाणीव आहे. तसेच त्या तलाठी महिलांवर जे प्रसंग ओढवत आहे. त्यांची मला कल्पना आहे. त्यांना न्याय देणे ही माझी जबाबदारी आहे.
तरी या तक्रारींची दाखल घेऊन लवकरात लवकर भ्रष्टाचारी तहसिलदार यांची हकालपटटी करून त्यांच्या वर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तहसिलदार यांच्यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी व सर्व पीडित नागरिकांसोबत उपोषण करण्यात येईल, असं निवेदनात म्हंटले आहे.