अमळनेर (प्रतिनिधी) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना देण्यात यावी, याकरिता साधारणतः १७० ते १८२ आमदारांनी जुन्या पेन्शन करीता शिफारस पत्र दिले असतांना सुद्धा शासनाने आजतागायत शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेपासून महाराष्ट्रात २५ हजार कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ३२ विभागातील दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळत असून फक्त शालेय शिक्षण विभागावर अन्याय का?
विरोधी पक्षांमध्ये असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात लक्षवेधी ठरवला होता. आता राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री असताना जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना का देत नाही असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारला आहे?
अनुदान देणे हा शासनाच्या स्वेच्छाधिकार असला तरी आमची मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरणे हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. शासन आमची शंभर टक्के अनुदानाची तारीख ग्राह्य धरून जर आम्हाला जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते सहन केले जाणार नाही यासाठी २३ डिसेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय संगीताताई शिंदे व कोअर कमिटी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने घेतलेला आहे.
या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित अंशत अनुदानित शाळा किंवा तुकडी नवनियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदान मिळालेल्या कर्मचार्यांना त्यांची मुळनियुक्ती दिनांक ग्राह्य धरून १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शिफारस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी करावी, अशी विनंती आमदार अनिल पाटील यांना शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने अमळनेरला करण्यात आली.
यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, जुनी पेन्शन योजनेपासून २००५ पूर्वी जे शिक्षक वंचित आहेत. त्यांचा प्रश्न माझ्या परीने अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करेल व आपल्यास न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहील, असे आश्वासन आमदार पाटील यांनी शिक्षण संघर्ष संघटना अमळनेर येथे पेन्शन वंचित शिक्षकांना दिले.
आमदार पाटील यांना निवेदन देताना शिक्षण संघर्ष संघटनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष प्रभुदास पाटील, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, अनिल महाजन,एम.ए पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, निवृत्ती पाटील, दिनेश पाटील रवींद्र पाटील, शरद अहिराव, युवराज पाटील, महेश पाटील, भगवान पाटील, किशोर पाटील, सुरेश महाजन, हरी माळी, युवराज पाटील, कल्पना पाटील, सुभाष ठाकरे, कैलास पाटील, संदीप गोसावी, अशोक सूर्यवंशी, सुषमा सोनवणे, दिलीप पाटील, प्रवीण पाटील, विजय पाटील, वर्षा पाटील, जगदीश पाटील, भरत पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटीलसह अनेक पेन्शन पीडित शिक्षक उपस्थित होते.