अमरावती (वृत्तसंस्था) अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक वडिलांचा मृत्यू झाला. तर दोन मुले गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास अंजनगाव सुर्जी-दर्यापूर मार्गावरील लेहगाव फाट्यानजीक घडली. प्रशांत विश्वनाथ डोंगरदिवे (४२) रा. लेहगाव असे मृतकाचे नाव आहे. तर शुभ्रा प्रशांत डोंगरदिवे (११) व उत्कर्ष प्रशांत डोंगरदिवे (८) अशी जखमींची नावे आहे.
प्रशांत हे मुलगी शुभ्रा व मुलगा उत्कर्ष यांच्यासह दुचाकीने लेहगाव येथून कामानिमित्त अंजनगाव सुर्जी येथे जात होते. मार्गात लेहगाव फाट्यानजीक एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात प्रशांत डोंगरदिवे यांच्यासह शुभ्रा व उत्कर्ष हे तिघेही गंभीर जखमी झाले. अपघाताबाबत कळताच शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी सहकारी अतुल सगणे, विनय गावंडे, राहुल भुंबर, सचिन कोरडे, सचिन शेलार, पंजाब नागे, सूरज पाचखंडे यांच्यासह घटनास्थळ गाठून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून प्रशांत डोंगरदिवे यांना अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रशांत डोंगरदिवे हे नोकरीनिमित्त मुंबई येथे राहत होते. दिवाळीसाठी ते कुटुंबीयांसह लेहेगाव येथे आले होते.