जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघाचा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी कर्मचारी कपात करण्यात आली असून, झालेल्या गैरव्यवहारांविषयी आपण आठवडाभरात न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. काळातील आणखी एक आर्थिक अपहाराचे प्रकरण पुढे आले आहेत. ऑडिटमध्ये अडीच ते तीन कोटी रूपयांचा नियोजनबद्ध अपहार केल्याचा आरोप दूध संघाचे चेअरमन आमदार चव्हाण यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दूध संघातील नोकर कपात व गैरप्रकार याविषयी माध्यमांशी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की, दूध संघातील गैरव्यवहारांविषयी यापूर्वी आपण ज्या काही तक्रारी केलेल्या आहेत, त्याचा सर्व तपास पुराव्यासह लवकरच समोर येईल खडसे परिवार दूध संघाला खासगी मालमत्ता समजून कारभार करत होता, असा आरोपही त्यांनी केला. त्या काळात जे काही गैरव्यवहार झाले आहेत, त्याविषयी आपण आठवडाभरात न्यायालयात जाणार असल्याचेही ते म्हणाले.
तसेच जिल्हा दूध संघात लोणी, बटर विक्रीतील अपहाराची चौकशी अंतिम टप्यात आहे. दुसरीकडे संघातील आधीच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळाची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले आहे. त्यात प्रथमदर्शनी अडीच ते तीन कोटी रूपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात लवकरच संबंधित जबाबदार लोकांवर पोलिसांत फिर्याद देणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हा दूध संघात यापूर्वीच्या संचालक मंडळाकडून कर्मचाऱ्यांना केवळ ४ तासांच्या शिफ्टचा पगार दिला जात होता. दूध संघ कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या खर्चामुळे तोट्यात जात होता. अनेक कर्मचारी संचालकांचे पगारी कार्यकर्ते होते. अशा अतिरिक्त लोकांना कामावरून कमी केले आहे. उत्पादनावर होणारा खर्च कमी करण्यावर भर असल्याने कॉस्टकटिंग केली जात असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.