गेवरा जि. चंद्रपूर (वृत्तसंस्था) घराच्या अंगणातून एका चार वर्षीय बालकाला त्याच्या आईच्या डोळ्यादेखत वाघाने तोंडात उचलून नेले. एकुलत्या एक मुलाला वाघ नेत असल्याचे बघून आईने जिवाच्या आकांताने टाहो फोडला. लोक धावले. रात्रभर व दिवसाही वन विभाग व पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम राबविली. परंतू वाघाने बालकाचे ६० टक्के शरीर फस्त केले होते. सावली तालुक्यातील गेवरा बिटातील बोरमाळा येथे ही घटना घडली.
हर्षद संजय कारमेंगे (५) असे मृत बालकाचे नाव आहे. आई अतिक्षा ही हर्षदला शौचास लागल्याने त्याला अंगणात बसवून उभी असतानाच वाघाने अंधारातून येत हर्षदवर हल्ला केला. चिमुकला हर्षद संजय व अतिक्षा यांचा एकुलता एक मुलगा होता. वडील मजुरीसाठी बाहेर गेले होते. आई हर्षदला घेऊन घरी होती. सायंकाळी स्वयंपाक करून हर्षदला खाऊ घालण्याची तयारी केली. तेव्हाच हर्षला शौचास जायचे असल्याने त्याने आईला सांगितले. परिस्थिती एवढी हलाखीची की, घरी वीज नाही. घरासमोरील अंगणात आईने त्याला शौचास बसविले होते. त्याचवेळी वाघाने डाव साधला. गुरुवारी सकाळी घटनास्थळापासून चारशे मीटर अंतरावर हर्षदचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीराचा कमरेवरील भाग नव्हताच.