धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचे आगामी उमेदवार ठरू शकतात, अशी मोठी चर्चा सध्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी वेळ असला तरी उद्योजक सुरेशनाना चौधरी यांच्याकडे आतापासून संभाव्य उमेदवार ठरू शकतात, असे बोलले जात आहे. लोकसभा मतदारसंघात सुरेशनाना चौधरी यांचा जिनिगच्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी, तरुण, उद्योजक, सामाजिक संस्थासोबत जवळचे संबंध आहेत. याच पद्धतीने जळगाव लोकसभा मतदार संघात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. सुरेशनाना हे तेली समाजातील प्रतिष्ठीत तथा आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास याचा मोठा फायदा त्यांना होऊ शकतो. त्याचपद्धतीने शिवसेना म्हणून आजच्या घडीला जिल्ह्यातील ज्येष्ठ पदाधिकारींपैकी एक आहेत.
मागील विधान परिषद निवडणुकीतही सुरेशनाना चौधरी यांनी पक्षादेश मान्य करत आपली उमेदवारी मागे घेतली होती. जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेकडून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच धर्तीवर सुरेशनाना चौधरी यांची जळगाव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सुरेशनाना चौधरी यांचे क्रीडा,आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांमधून त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो. विशेष म्हणजे भाजप-सेना युती असतांनाही मागील लोकसभेच्या वेळी शिवसेनेने जळगाव लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. आता तर हा मतदार संघ शिवसेना स्वबळावर लढण्यास स्वतंत्र आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा व जळगाव शहरात शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यासोबत अमळनेर व चाळीसगाव तालुक्यातही काही प्रमाणात बळ आहे. तसेच सुरेशनाना यांचे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्याचा फायदा निवडणुकीत शिवसेनेला होईल. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघातून सुरेशनाना चौधरी यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येऊ शकतो, असा विश्वासही पदाधिकारी व्यक्त करत आहे.