पुणे (वृत्तसंस्था) पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात (Pune and Pimpri Chinchwad) कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ कायम असल्याचं दिसत आहे. ही रुग्णांची संख्या रोखण्यासाठी आता कठोर निर्बंध लावणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुण्यात 14 जानेवारी रोजी 5480 कोरोना बाधितांची नोंद झाली आणि 2674 रुग्णांनी करोनावर मात केली. आजपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची खएकूण संख्या 548569 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 510793 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुण्यात 13 जानेवारी रोजी 5571 नव्या रुग्णांची नोंद झाली होती आणि 2335 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत पुण्यात कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची संख्या वाढत आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल चौपट मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.