नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूदरात अजूनही वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ३ लाख २६ हजार ०९८ नव्या रुग्णसंख्येची भर पडली असून ३८९० रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी ३,५३,२९९ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.
देशातील कोरोना परिस्थिती कायम आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं आकडेवारीतून दिसत असलं, तरी अद्यापही देशात साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण दररोज आढळून येत आहेत. तर मृत्यू संख्येचा आलेख मात्र चार हजारांच्या मागे पुढेचं सरकताना दिसत असून, देशातील कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ अद्याप कायम आहे. गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तितकीच एक बाब देशासाठी दिलासा देणारी ठरली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारीनुसार, भारतात काल दिवसभरात तीन लाख २६ हजार ९८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार २९९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मृत्यू संख्येच्या सरासरीत कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून दररोज चार हजारांच्या आसपास मृत्यूंची नोंद होत आहे. देशातील एकूण मृतांची संख्या २ लाख ६६ हजार २०७ वर पोहोचली आहे. तर सध्या देशात ३६ लाख ७३ हजार ८०२ रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. शुक्रवारी ५३,२४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ३९,९२३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण ४७,०७,९८० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्के एवढे झाले आहे.
















