नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दीड हजारांनी वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ५० हजार ०४० रुग्णांची भर पडली आहे तर १ हजार २५८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत देशभरात ५० हजार ४० नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ५७ हजार ९४४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, १ हजार २५८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०२,३३,१८३ झाली आहे. आजपर्यंत २,९२,५१,०२९ रूग्ण बरे झाले असून, ३,९५,७५१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव केसेसची संख्या ५,८६, ४०३ झाली आहे. देशातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.७५ टक्के आहे.
दरम्यान, देशात जून महिन्यात कोरोनाच्या रोज १८ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४० कोटींचा टप्पा ओलांडला गेला आहे, अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आज ९,८१२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८,७५२ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात आता बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,८१,५५१ इतकी झाली आहे. आज १७९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या १,२१,१५१ अॅक्टिव्ह केसेस आहेत.