अमळनेर (प्रतिनिधी) तुमचे क्रेडीट कार्ड हे कायम स्वरुपी बंद करण्यासाठी तुम्ही मी सांगीतल्याप्रमाणे मोबाईलवर अॅप डाउनलोड करा सांगून भामट्याने अमळनेरातील एकाची तब्बल १ लाख २० हजारात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल रघुनाथ पवार (रा.शांता निवास, शिरूड नाका, अमळनेर) असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, अनिल रघुनाथ पवार हे शहरातील शिरूड नाका परिसरात वास्तव्यास आहेत. २३ ऑगस्ट रोजी अनिल पवार हे घरी असतांना त्यांना एक फोन आला. समोरून बोलणाऱ्या भामट्याने सांगितले की, तुमचे क्रेडीट कार्ड हे कायम स्वरुपी बंद करण्यासाठी तुम्ही मी सांगीतल्याप्रमाणे मोबाईलवर अॅप डाउनलोड करावे लागेल. अनिल पवार यांनी सदर अॅप डाउनलोड करून केल्यावर समोरील व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे माहीती क्लीक केली. त्यानंतर त्यानी ऑनलाईन बँकींगसाठी ‘गुगल पे’वर जाण्यास सांगीतले. यानंतर पवार यांच्या खात्यातून २५ हजार आणि नंतर ९५ हजार रुपये काढल्याचे लक्षात आले. त्यानंतर समोरील अज्ञात भामट्याने पवार यांचा फोन कट केला. अशा प्रकारे श्री.पवार यांची तब्बल १ लाख २० हजारात फसवणूक झाली आहे. या संदर्भात ९८२७ ९६००२३ या क्रमांकाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि गंभिर शिंदे हे करीत आहेत.
















