कोल्हापुर (वृत्तसंस्था) कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द इथं राहणाऱ्या तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली आहे. सीताबाई शिवाजी पाटील (वय ५४), सातापा भाऊ पाटील (वय ५२), जनाबाई विठ्ठल कांबळे (वय ८०), अशी मयतांची नावे आहेत. उष्माघाताने या तिघांचा बळी गेल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
सोमवारी सकाळी सीताबाई शिवाजी पाटील या नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेल्या होत्या. सकाळपासूनच कडक उन्हात त्या शेतात काम करत होत्या. दुपारच्या सुमारास उष्णता वाढल्याने सीताबाई घरी आल्या. तहान लागल्याने त्या पाणी प्यायल्या. नंतर क्षणार्धातच त्यांना चक्कर आली आणि त्या जागीच कोसळल्या. दुसऱ्या घटनेत सातापा भाऊ पाटील यांचा मृत्यू झालाय. त्यांना मागील दोन दिवसापासून वाढत्या उन्हाचा त्रास होऊ लागला होता. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचेही सोमवारी निधन झाले. तर तिसऱ्या घटनेत जनाबाई विठ्ठल कांबळे यांचा देखील मृत्यू झाला असून उष्णतेचा त्रास तसेच धाप लागू लागल्याने त्यांना चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचाही सोमवारी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, आता राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्णतेची लाट पसरत आहे. यामुळे नागरिकांनी घरा बाहेर जायचे असल्यास छत्री, टोपी, गॉगल, पाण्याची बाटली घेऊनच बाहेर पडावे आणि शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त ठेवावे. अगदी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.