नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील एका गावातील लग्नात शेकडो लोकांसमोर स्टेजवर जाऊन एका प्रियकराने नवरी बनलेल्या प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरलं. परिवारातील लोक आणि पाहुणे संतापले तेव्हा एकाने पोलिसांना फोन करून बोलावलं. पोलीस आल्यानंतर रात्री उशीरापर्यंत पंचायत सुरू होती. अखेर नवरदेव सर्व विधी करून नवरीला आपल्या घरी घेऊन गेला.
हरपूर बुदहट गावातील एक तरूण आणि त्याच गावातील तरुणी एकमेकांवर प्रेम करत होते. काही महिन्यांपूर्वी प्रियकर दुसऱ्या शहरात नोकरी करण्यासाठी गेला. यादरम्यान तरूणीच्या परिवाराने तिचं लग्न ठरवून टाकलं. प्रेयसीने हा सगळा प्रकार प्रियकराला सांगितला. त्यामुळे तो दोन दिवसाआधीच गावात आला होता. १ डिसेंबरला वरात आली होती. नवरी-नवरदेव स्टेजवर होते. अशात अचानक प्रियकराने स्टेजवर जाऊन नवरीच्या भांगेत कुंकू भरलं. यानंतर तरूण आणि नवरीने एकमेकांना मिठी मारली. हे बघून तिथे उपस्थित सगळेच हैराण झाले.
प्रकरण वाढत असल्याचं बघून मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. अशात नवरी आणि नवरदेवाच्या परिवारांमध्ये वाद अधिक पेटला. तिकडे प्रियकर आणि नवरी एकमेकांसोबत राहण्याचा हट्ट करत होते. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर प्रियकराचा प्रेमाचा ताप उतरला. तो त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर मोठ्या लोकांनी प्रकरण सॉल्व्ह केलं आणि गुरूवारी नवरीची पाठवणी करण्यात आली.