नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात आयकर विभागाच्या पथकाने शुक्रवारी छापे टाकल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील एका सराफा व्यावसायिकाच्या दालनावर तर मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बडड्या उद्योगपतीच्या कार्यालयासह घरावर छापेमारी केली आले आहे.
सराफा आणि बांधकाम व्यावसायिकाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी !
नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा सराफ बाजार विस्तारत आहे. येथील कॅनडा कॉर्नर परिसरात एका नामांकित सराफ व्यावसायिकाच्या दालनावर शुक्रवारी (दि.२४) सकाळी आयकर विभागाने छापा टाकला. या सराफा व्यावसायिकाचा स्वतःचा बांधकाम व्यवसाय आहे. व्यावसायिकाच्या एकूणच आर्थिक व्यवहारांची चौकशी आयकर विभागाच्या वतीने सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
मनमाडमधील बड्या उद्योगपतीच्या कार्यालयवर छापा !
मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका बड्या उद्योगपतीच्या कार्यालय व घरावर आयकर विभागाने छापा मारल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून, विविध चर्चांना उधाण आले आहे. आज सकाळपासून आयकर विभागाच्या गाड्या, अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस उद्योगपतीच्या कार्यालय व घरासमोर उभे होते. आयकर विभागाकडून सकाळपासूनच तपासणी सुरु होती. छापा टाकण्यात आलेल्या मनमाडच्या या उयोगपतीचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. याच उद्योगपतीच्या नाशिक येथील एका फर्मवरही छापा मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या छाप्याबाबत आयकर विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. गेल्या दोन-चार दिवसांपासून मनमाड शहरातील युनियन बँकेतील कथित एफडी घोटाळा प्रकरणाची चर्चा जोरदारपणे रंगत असतानाच मनमाड शहरात आयकर विभागाने छापा टाकल्याने चर्चेला उधाण आले आहे.