मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिलांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकासआघाडीवर गंभीर आरोप केलेत. सरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करु असं म्हटले. मात्र, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली. सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
“वीज बिलाबद्दल पहिलं आंदोलन आमच्या पक्षानं केलं. भाजपा काय पुढे येतंय. या सगळ्या ठिकाणी आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. खास करून नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे की, त्यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं. वीज कंपन्यांकडून जी बिलं येताहेत, ती प्रत्येकाला येत आहे. लॉकडाउनमध्ये तुम्हाला त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून नागरिकांना पिळणार असाल, तर कसं होईल. सरकारमधील मंत्री म्हणाले होते, कपात करून. नंतर एकदम घुमजाव झालं,” असं राज ठाकरे म्हणाले. “या मुद्द्यावर राज्यपालांना भेटायला गेलो. राज्यपालांनी शरद पवार यांना बोलायला सांगितलं, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की, त्या वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा. ते पत्र मला पाठवा. त्यामध्ये अदानी असतील, एमएसईबी असो वा टाटा, मी त्यांच्याशी बोलतो, असं पवार म्हणाले होते. मग पाच सहा दिवसांनी मला असं कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर सरकारकडं असं आलं की, वीज बिल माफ केलं जाणार नाही,” असं म्हणत राज ठाकरे यांनी पवार-अदानी बैठकीबद्दल शंका व्यक्त केली.
सरकार आंदोलन केल्यावर आंदोलकांवर गुन्हे दाखल करतंय, वीज बिल माफही करत नाही. लोकांना भरमसाठ वीज बिलं भरण्यास सांगितलं जातंय. हे सगळं कुणासाठी सुरु आहे? असाही सवाल राज ठाकरेंनी विचारला. राज ठाकरे म्हणाले, “सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं कळत नाहीये. मुलांच्या परीक्षांचा विचार नाही करायचा, कशाचाच विचार नाही करायचा. वीज बिल माफ होण्यासाठी वीज कंपन्यांबरोबर चर्चा कराव्या लागतील. पण या चर्चा थांबल्या आहेत. काही तरी लेणदेण झाल्याशिवाय या चर्चा थांबणार नाहीत. सरकार सर्व वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे.”