जळगाव प्रतिनिधी । जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.रामानंद जयप्रकाश यांच्या यशस्वी कारकिर्दीच्या शंभर दिवसानिमित्त जळगाव कोविड केअर युनिटतर्फे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला आहे.
जळगाव शहर हा कोरोना रुग्णांबाबत संपूर्ण महाराष्ट्रात हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला होता. तात्कालीन अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात बाधित व संशयास्पद कोविड रुग्णांबाबत निष्काळजीपणा होत होता व त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. अशा वेळी शासनाने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.रामानंद जयप्रकाश यांची नियुक्ती केली आणि डॉक्टर जयप्रकाश यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच त्यांच्या सहकार्यांसोबत व जळगाव येथील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार करून, वेळो-वेळी त्या सूचनांची दखल घेऊन जो १०० दिवसात कोविड रुग्णालयाचा कायापालट केला व जळगाव शहराला एक वेगळा पॅटर्न आणून दिला. त्याबद्दल आज जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच कोविड हॉस्पिटल येथे जाऊन डॉक्टर रामानंद जयप्रकाश यांना जळगाव कोविड केअर युनिटचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, युनिटचे प्रसिद्धीप्रमुख व शासकीय समनव्यक फारुक शेख, डायरेक्टर अनिस शहा व अन्वर खान सिकलगर यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी फारुक शेख यांनी डॉक्टर जयप्रकाश यांच्याकडे जळगावकरांच्या सेवेबाबत करीत असलेल्या कामाबाबत तसेच त्या कार्यात अजुन गतिशीलता व पारदर्शकता येण्यासाठी आपण जास्त मेहनत घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. हाजी गफ्फार मलिक यांनी जळगाव कडे सर्व राजकीय, सामाजिक व प्रशासनाचे लक्ष असल्याने आपण करीत असलेल्या कार्या मुळे महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा त्याची दखल घेतली जात असल्याने याला आपण टिकून ठेवावे अशी सूचना केली.
डॉक्टर रामानंद यांनी सवांद साधित जळगावकरांची सेवा करण्याची संधी मिळाली व ती सेवा चांगल्या प्रकारे पार पाडीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वांचे सहकार्य असल्यास यात अजून चांगल्या प्रकारे सुधारणा करता येतील व जे जे करता येईल तेथे मी माझ्या सहकाऱ्या सोबत व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करेल असे आश्वासन दिले.