जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस) राज्यातील माजी स्वयंसेवक युवकांच्या माध्यमातून राज्यात विधायक कार्य घडावे, या उद्देशाने नवसुर्योदय सेवा सामाजिक संघटना अर्थात (एन.एस.एस.ओ) ची स्थापना केली आहे. या संघटनेच्या युवक विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी जळगाव येथील रासेयोचे उत्कृष्ठ स्वयंसेवक, राष्ट्रीय बुध्दिबळ खेळाडू तथा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे जिल्हा सचिव आकाश धनगर यांची तर युवती विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी अमळनेर येथील युवा सामाजिक कार्यकर्त्या, प्रताप महाविद्यालयातील रासेयोची उत्कृष्ट स्वयंसेविका तथा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या तालूका सचिव मयुरी दिनेश माळी (पाटील) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
(दि.१९ सप्टेंबर) रोजी त्यांना निवडपत्र प्राप्त झाली आहेत. या सेवाभावी युवक व युवतीचे क्रिडा,सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्य लक्षात घेता संघटनेचे अध्यक्ष संग्राम दत्तात्रय मोरे, सचिव दत्तात्रय जांबले पाटील यांनी ही निवड केली आहे. एन.एस.एस.ओ च्या माध्यमातून जिल्ह्यातील आजी – माजी रासेयो स्वयंसेवकांसह समाजातील इतर युवकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करून विधायक कार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विवीध राष्ट्रीय व राज्यस्तरीय शिबिरांत सहभागी होवून सामाजिक कार्यात अगेसर असतात तर कु.माळी यांनी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात रासेयो प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. विविध क्षेत्रात कार्य करणारे सेवाभावी युवा म्हणून या दोघांची समाजात ओळख राहिली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.