जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून एमआयएम, शिवसेना व भाजपचे फुटलेले असे एकून ४५ नगरसेवक एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे महापालिकेत सत्तांतर निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
जळगाव महापालिकेत महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे तब्बल ३१ नगरसेवक फुटले असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत खडसे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नाराज आहेत. हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. भाजप, शिवसेना व एमआयएम असे ४५ नगरसेवक सत्ता स्थापन करणार आहेत. गेले अडीच वर्ष महापालिकेत भाजपची सत्ता आहे. जळगावात विकासाचे चित्र चांगले नाही. नगरसेवक ना खुश आहेत. नगरसेवक व प्रशासन एकत्र नाही. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मला हे सर्व नगरसेवक भेटले मी त्यांना म्हणालो सर्वांचे एकमत असेल तर सत्तातंर करावयास हरकत नाही, त्यामुळे सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. भाजप, शिवसेना व एमआयएम अशी एकत्रतीत सत्ता स्थापन होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सांगलीमध्ये भाजपकडे बहुमत असूनही जयंत पाटलांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ राष्ट्रवादीचा महापौर केला. आता हाच सांगली पॅटर्न जळगाव महापालिकेत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता उलथविण्यासाठी शिवसेनेने फासे टाकले असून त्यांच्या गळाला अनेक नगरसेवक लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप व माजी मंत्री गिरीश महाजन यांना महापौर निवडणुकीत जबर धक्का बसेल, अशी चर्चा आहे.
मागील निवडणुकीमध्ये भाजपने महापालिका सत्ता आणली खरी, पण राज्यात भाजपने सत्ता गमावली. गेल्या वर्षभरात केंद्राचा पैसा वगळता कुठलाही निधी जळगाव महापालिकेला मिळाला नाही. अशा परिस्थितीत अनेक नगरसेवक बेचैन झाले. भाजपात राहून निधी मिळू शकत नसल्याने अनेक नगरसेवक सेना आणि राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचं दिसत आहे.