नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. भारत-चीन दरम्यान लडाखमध्ये तणाव सुरू असताना चिनी सैन्याकडून इतर ठिकाणीही घुसखोरी सुरू आहे. सिक्किमध्ये ही मागील आठवड्यात चिनी सैन्याना नाकू ला भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी हा डाव हाणून पाडला. तर २० चिनी जवान जखमी झाले असल्याची माहिती आहे. या संघर्षात शस्त्रांचा वापर झाला नाही.
चिनी सैन्याने सिक्कीममधील नाकू ला भागात घुसखोरी करत सीमा रेषेवरील सध्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चीनचे काही सैन्य भारतीय क्षेत्रात येत असल्याचे जवानांना दिसले. त्यानंतर भारतीय जवानांनी चिनी सैन्याला या भागातून हुसकावून लावले. इ़ंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून या संघर्षात चार भारतीय जवान जखमी झाले असून २० चिनी जवान जखमी झाले आहेत. सध्या सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण असून स्थिर आहे. उत्तर सिक्कीमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असतानाही, भारतीय जवानांनी चीनचा घुसखोरीचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही. पीएलएच्या सैनिकांना मागे ढकलले. चकमक झालेल्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे. सिक्कीकमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असले, तरी भारतीय सैन्याचे चीनच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही महिन्यापूर्वी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात पॉईंट १४ जवळ दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. पूर्व लडाख सीमेवरील वाद अद्यापी मिटलेला नाहीय. नऊ फेऱ्यांच्या चर्चेनंतरही काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. सिक्कीममधील या घटनेमुळे आता पूर्व लडाखमध्येही तणाव वाढू शकतो.
भारत-चीनमध्ये १५ तास चर्चा
पूर्व लडाख भागात सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत आणि चीन दरम्यान कमांडर स्तरावरची नववी बैठक रविवारी पार पडली. तब्बल १५ तास चाललेली ही बैठक रविवार-सोमवारच्या रात्री जवळपास २.३० वाजता संपली. मोल्डो भागात रविवारी सकाळी जवळपास ९.३० वाजता ही बैठक सुरू झाली होती. या बैठकीत भारताकडून सेनेच्या १४ कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन आणि चीनकडून दक्षिण शिनजियांग मिलिट्री रीजन कमांडर मेजर जनरल लियू लीन यांनी सहभाग घेतला.