नवी दिल्ली (वृत्तसंस्था) युरोपीयन देश ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून१५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, व्हिएन्नामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मोठा धक्का बसला असून दुःख झाले आहे. या संकटाच्या काळात भारत ऑस्ट्रियासोबत उभी आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये २६/११ प्रमाणे दहशतवादी हल्ला झाला असल्याचं वृत्त समोर येत आहे. व्हिएन्ना शहरातील कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांनी एकाच वेळी हल्ला केल्याचं समोर आलं आहे. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मृतांमध्ये एका दहशतवाद्याचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रान्समध्ये एका दहशतवाद्याने हल्ला केला होता. त्यानंतर आता युरोपमधील आणखी एका देशात असाच हल्ला झाल्याने संपूर्ण युरोपमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.