चोपडा (प्रतिनिधी) भारतीय कृषक समाज आर्थिक सक्षम करण्यासाठी शेती शिक्षण व्यवस्था जर बळकट केली तर,आधुनिक व प्रशिक्षित शेतकरी निर्माण होऊन अर्थव्यवस्था गतिमान करू शकतो. हा दृष्टिकोन समोर ठेऊन, स्व.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सतत कार्यमग्न राहिले. असे मत दर्यापूर महाविद्यालयातील प्रा.डॉ.हरिदास आखरे यांनी व्यक्त केले.
श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालय,गाडेगाव तेल्हारा व चोपडा जि. जळगाव येथिल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंजाबराव देशमुखांचे विचार आणि कार्याचा प्रसार प्रचार करण्याच्या हेतूने आयोजित डॉ.पंजाबराव देशमुख यांचे आर्थिक व कृषीविषयक विचार या विषयावर प्रा.डॉ.आखरे पुढे बोलतांना म्हणाले की,समूह शेतीचा विचार अंमलात आणून समान कष्ट समान वाटा हे पंजाबराव देशमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे.आपण जगाची भ्रमंती करतो परंतु शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचत नाहीत. त्यांच्या मनापर्यंत पोचून आर्थिक व सामाजिक उन्नयन करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय भाषण केले. तेल्हारा येथील सह आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाल ढोले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. वक्त्यांचा परिचय तेल्हारा महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.धीरजकुमार नजान यांनी करून दिला. तत्पूर्वी तेल्हारा महाविद्यालया तर्फे स्थानिक महाविद्यालयाला पंजाबराव देशमुख यांची प्रतिमा व ग्रंथ भेट करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थानिक महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विशाल हौसे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्येते प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी केले तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.चंद्रकांत रंभाजी देवरे यांनी मानलेत. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.