नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. देशभरात दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत लाखोंनी वाढ होत आहे. त्यामुळेच भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने ४ मेपासून भारतीयांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे. व्हाईट हाऊसने शुक्रवारी एका निवेदनात याबाबत माहिती दिली.
भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाचे अनेक प्रकारचे व्हेरियंट पसरत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीयांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ४ मेपासून हा आदेश प्रभावी असेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. याआधीही अमेरिकेनं आपल्या देशातील नागरिकांना भारतात न जाण्याचा आणि लवकरात लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला होता.
या देशांनी केली आहे प्रवेश बंदी
भारतातील प्रवाशांवर बंदी घालणारा अमेरिका पहिला देश नाही. याआधीही ब्रिटन, इटली, जर्मनी, फ्रांस, यूएई, पाकिस्तान आणि सिंगापूरसह अनेक देशांनी अशाच प्रकारचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे कॅनडा, हाँगकाँग आणि न्यूझीलंडनंही भारतासोबतचे सर्व कमर्शियल प्रवास पुढे ढकलले आहेत.