नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी चीनसाठी त्यांनी भारताची भूमी चीनला दिली. पंतप्रधान मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत. अशा शब्दात राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. भारत आणि चीन यांच्यातील वास्तविक नियंत्रण रेषावरुन सैन्य मागं घेण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना त्यांनी हा आरोप केला. भारताची जागा फिंगर ४ वर आहे, तर भारतीय लष्कर फिंगर ३ वर का आले? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. ‘पंतप्रधानांनी फिंगर 4 चीनला का दिलं? आपल्या सैनिकांनी कैलास रेंजवर ताबा मिळवला होता. मात्र ते आता तिथून मागे येत आहेत, हे असं का होत आहे? नरेंद्र मोदी यांनी चीनपुढे शरणागती पत्कारली आहे,’ असा आरोप राहुल यांनी यावेळी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरट असून ते चीनच्या पुढं टिकू शकले नाहीत. आपल्या सैन्याच्या बलिदानाचा ते अपमान करत आहेत. देशात कुणालाही असं करण्याची परवानगी देता कामा नये. या देशाचं संरक्षण करणे हे पंतप्रधानांची जबाबदारी आहे. ते संरक्षण कसं करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही.” अशी टीकही राहुल यांनी यावेळी केली.
“रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या देसपांग प्लेन्सच्या भागाबद्दल संरक्षण मंत्री एक शब्दही बोलले नाहीत. तिथे सुद्धा चीनने अतिक्रमण केले आहे. मोदींनी भारताची भूमी चीनला दिली आहे, त्याबद्दल त्यांनी देशाला उत्तर दिले पाहिजे” असे राहुल गांधी म्हणाले.