रशिया (वृत्तसंस्था) श्रीलंकेत रशिया आणि युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. या देशात महागाई बोकाळली आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने श्रीलंकेत जणू सर्वत्र महागाईचा भस्मासूर जन्मला आहे. दुधाचे दर सोन्याहून अधिक झाले आहेत. त्यामुळे देशात दिवाळखोरीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
ब्रेडचे पाकीट १५० रुपयांना
महागाईमुळे गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जवळपास एक हजार बेकरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे ब्रेडच्या एका पॅकेटच्या किंमत १५० रुपयांवर पोहचली आहे.
चिकन तर सामान्य लोकांच्या बजेटच्या बाहेर गेले आहे.
दिवसभरात ७ तासांपेक्षा अधिक वेळ वीज गायब असल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पर्यटन व्यवसाय ठप्प
श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय अगोदरच ठप्प झाला आहे.
जवळपास ५ लाख लोकांचा रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे. तर, २० लाख अप्रत्यक्षपणे पर्यटनाशी जोडले गेलेले आहेत.
दिवाळखोरीची घोषणा होणार?
चीनसह अनेक देशांच्या कर्जात बुडालेला श्रीलंका दिवाळखोर जाहीर होऊ शकतो. जानेवारीत श्रीलंकेची परकीय चलन गंगाजळी ७० टक्के कमी होऊन २.३६ अब्ज डॉलर झाली आहे. श्रीलंकेला आगामी १२ महिन्यात ५४ हजार कोटींचे देशांतर्गत आणि विदेशी कर्ज चुकते करायचे आहे.