मुंबई (वृत्तसंस्था) देशात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 14 किलोच्या घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सिलेंडर घेण्यासाठी आता 1 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने आता गृहिणींच्या बजेवट याचा परिणाम होणार आहे. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईतही सिलिंडर 1053 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 3.5 रुपयांनी वाढली होती. त्यामुळे एका सिलिंडरची किंमत 1,003 रुपये झाली होती. पूर्वी ती 999.50 रुपये होती. सिलिंडर एक हजार रुपायांच्या पार गेल्यानंतर ही थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. 1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. त्यावेळी प्रति सिलेंडर 102.50 रुपये किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्याशिवाय त्याआधी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी दरात 250 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे सध्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करावं लागेल. दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर (Price) जाहीर केले जातात.