नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अर्थसंकल्प 2022 मध्ये केलेल्या काही तरतुदींमुळे 1 एप्रिलपासून ग्राहकांवरील महागाईचा बोजा आणखी वाढणार आहे. उद्यापासून टीव्ही, एसी फ्रीजसह मोबाईल वापरणेही महागणार आहे. वास्तविक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ केली होती, तर काहींवर ती कपात करण्यात आली होती. नवीन शुल्क १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
या कारणामुळे वाढणार टीव्ही, एसी आणि फ्रीजच्या किमती
सरकारने 1 एप्रिलपासून अॅल्युमिनियम धातूवर 30 टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. याचा वापर प्रामुख्याने टीव्ही, एसी, फ्रीज आणि हार्डवेअरमध्ये केला जातो. कच्च्या मालाचा पुरवठा महागल्यानं कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे आणि त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडणार आहे. याशिवाय कॉम्प्रेसरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरचं आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे रेफ्रिजरेटरच्या किमती वाढणार आहेत.
एलईडी बल्बच्या किमती वाढणार
एलईडी बल्ब बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवर 6 टक्के प्रतिपूर्ती शुल्कासह मूळ सीमाशुल्कही आकारलं जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे. 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू झाल्यानंतर एलईडी बल्बही महाग होणार आहेत.
मोबाइलमुळे वाढणार खर्च
सरकारने मोबाइल फोन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रिंटेज सर्किट बोर्डवरही कस्टम ड्युटी अर्थात सीमा शुल्क लागू केलं आहे. म्हणजेच बाहेरून या उत्पादनांची आयात आता महाग होणार असून, त्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असून, मोबाइलच्या किमती वाढू शकतात, असं मत ग्रॅंट थ्रॉन्टन या अमेरिकी फर्मने व्यक्त केलं आहे.
टेलिकॉम कंपन्या देणार झटका
आतापर्यंत ज्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना मोफत अमर्याद डाटा आणि कॉलिंग सुविधा देत होत्या, त्या सेवा कंपन्यांकडून 31 मार्चला बंद करण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत 4G मार्केटमधल्या वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आता टॅरिफ प्लॅन निवडावा लागणार असून, यामुळे त्यांचा मोबाइल वापरण्याचा खर्चही वाढणार आहे.
वायरलेस इअरबड्स आणि हेडफोन महागणार
वायरलेस इअरबड्समध्ये वापरल्या जाणाऱ्या काही पार्ट्सच्या आयात शुल्कात सरकारने अर्थसंकल्पात वाढ केली आहे. त्यामुळे या वस्तूंचं उत्पादन महाग होणार आहे. वायरलेस इअरबड्स उत्पादक कंपन्या एप्रिलपासून त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. याशिवाय, प्रीमियम हेडफोनच्या आयातीवर शुल्क वाढणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलनंतर हेडफोनदेखील महागणार आहेत.
















