नागपूर (वृत्तसंस्था) अल्पवयीनचे अश्लील छायाचित्र, व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत १२ जणांनी मागील दीड वर्षापासून सतत अत्याचार केल्याची मानवी कौर्याचा कळस गाठणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे संशयित आरोपींमध्ये एका सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकासह अग्निवीराचाही समावेश आहे.
गोलू लिखार, वेदांत विलास आवते, प्रणय डेकाटे, लीलाधर धर्मेंद्र चौरागडे, निखिल सदाशिव धांदे, सुशील कृष्णा धार्मिक, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील मुख्य आरोपी धीरज हिवरकर, गौरव खुबाळकर, विकास हेडाऊ, स्नेहल सुरकार, लकी धार्मिक, विक्की लिखार, अशी पसार आरोपींची नावे आहेत. घटनेतील मुख्य आरोपी धीरज हिवरकर (२१, रा. खापा ) याची काही दिवसांपूर्वी अग्निवीर म्हणून नियुक्ती झाली आहे.
धीरजने ओळखीच्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. मार्च महिन्यात त्याने मित्र गोलू लिखार याच्या घरी तिला बोलावून अत्याचार केला. अश्लील फोटो काढले, चित्रफीत तयार केली. आरोपी धीरज इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मित्र गोलूला सर्व छायाचित्र व व्हिडीओ दिले. गोलू व त्याच्या मित्रांनी तिला ब्लॅकमेल करीत समाजमाध्यमांवर छायाचित्र व्हायरल केले. एप्रिल महिन्यात गावातील विविध ठिकाणी तसेच वेगवेगळ्या परिसरात १२ जणांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. यातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
आरोपींविरुद्ध भांदविच्या ३५४ अ, ड, ३७६ अ, ड, ५०६, सहकलम ४, ६, ११, १२ पोक्सो अधिनियम २०१२, सहकलम ६७ अ, पिटा अॅक्ट २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी छायाचित्र व व्हिडीओ व्हायरल केल्याची माहिती पीडितेला मिळाली.
बदनामीच्या भीतीमुळे ती आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचली. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना शंका आली. त्यांनी तिला २५ सप्टेंबरला विश्वासात घेतले आणि तिची समजूत काढली आणि मंगळवारी खापा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सहा आरोपींना अटक करण्यात आली. तर सहा आरोपी पसार आहेत. या प्रकरणाचा तपास एसपी हर्ष पोद्दार व संदीप पखाले, डीवायएसपी अजय चांदखेडे यांच्या मार्गदर्शनात सावनेर ठाणेदार रवींद्र मानकर व खापा ठाणेदार मनोज खडसे करीत आहेत.