छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) घाटी परिसरात भर रस्त्यावर तरुणीला मारहाण करणाऱ्या कुख्यात तेज्यासह तिघांवर अखेर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. १) रात्री आठ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालय ते जुबली पार्क चौक या दरम्यान ही मारहाणीची घटना घडली होती. फैजल सय्यद उर्फ तेजा (रा. किले अर्क), जे के जावेद आणि शेख मुजाहेद अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी आरोपी फैजल सय्यद ऊर्फ तेजा याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.
सदर तरुणी तिच्या मैत्रिणी सोबत घाटी रुग्णालय ते जुबली पार्क रोडने जात होती. तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा फैजल सय्यद उर्फ तेजा याने तिचा रस्ता अडवला. दुचाकीवरून आलेल्या या तिघांनी शिवीगाळ करीत तिला मारहाण सुरू केली. भर रस्त्यात सुरू झालेला हा तमाशा पाहून गर्दी जमली होती. मात्र कुणीही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्याशी बोलत का नाहीस, माझ्याशी मैत्री का करत नाहीत असे म्हणत तेजाने सदर मुलीला बेदम मारहाण केली. तसेच तिच्या हातात असलेला विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. तर सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीलाही शिवीगाळ केली.
आरोपी तेजाच्या हातात चाकू होता आणि तो चाकू फियार्दी मुलगी व तिच्या मैत्रिणीला दाखवला. माझ्यासोबत दुचाकीवर बस असा आग्रह तेजाने धरला होता. मात्र तरुणी नकार देत पळू लागली. घाटीपासून सुरू झालेला हा गोंधळ जुबली पार्क चौकापर्यंत सुरू होता. अखेर घाटी पोलीस चौकीत ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार गोपाल सोनवणे यांना हा प्रकार दिसला व त्यांनी सदर तरुणीला तरुणांच्या तावडीतून सोडविले. घाटी पोलीस ठाण्यात आणले असता तिने तक्रार देण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर २ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तरुणीने तक्रार दाखल केली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तीनही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.