जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर परिसरातील ममुराबाद रस्त्यावर स्मशानभूमीच्या बाजूला एक तरुण रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडला होता. त्या तरुणाला हात लावायला देखील कोणी तयार नव्हते. त्यावेळी तिथून जात असलेल्या एका पत्रकारांने ट्रकमन आणि नागरिकांच्या मदतीने त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले.
त्या तरुणावर तात्काळ उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले आहे. डॉ. दीपक जाधव, डॉ. उमेश जाधव आणि परिचारिका व कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला ऑक्सीजन लावून उपचार सुरू केले. त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पायाला मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या तरुणाची ओळख पटलेली नाही.
ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमी शेजारी तरुण रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत असल्याचे शुक्रवारी दुपारी ३.३० पत्रकार जकी अहमद यांना दिसले. तसेच तिथून नागरिक त्याला बघून जा-ये करीत होते. पण त्या तरुणाला हात लावायला कोणी तयार नव्हते. तसेच १०८ ॲम्बुलन्सला कॉल करून देखील १५ मिनिट वाट पाहून अखेर त्याच वेळी परिसरातील ओळखीच्या नागरिकांना बोलवून ट्रेकमेन समशेर अली, नवाज अली, अरबाज खान, शोएब अली, यांच्या मदतीने रिक्षाचालक तुषार ठाकरे यांच्या रिक्षेत जकी अहमद यांनी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तसेच यासाठी जनसंपर्क कक्षाची मदत घेत जकी अहमद, समशेर अली यांनी त्या तरुणाला दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच जीआरपीचे हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील महाले यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी पत्रकार जकी अहमद, ट्रकमन समशेर अली यांचे अभिनंदन करून वेळेत तरुणाला उपचार मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पुढील कार्यवाही जीआरपी पोलीस करीत आहेत.