जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकले जात आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ आज शहरातील बी. जे. मार्केटमध्ये असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाबाहेर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यालयाबाहेर ‘भाजप प्राप्तिकर विभाग’ असे बॅनर लावत निषेध नोंदविला.
या आंदोलनाची भूमिका मांडतांना युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांनी सांगितले की, ‘भाजप सूडाचे राजकारण करत आहेत. सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर विभाग अशा केंद्रीय संस्थांना हाताशी धरून भाजपकडून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सुरू असलेली प्राप्तिकर विभागाची कारवाई ही अशाच सूडाच्या राजकारणाचा एक भाग आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आहोत. भाजपने समाजहिताचे राजकारण करायला हवे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही’, असेही कल्पिता पाटील यांनी सांगितले.
भाजपने प्राप्तिकर विभागाला हाताशी धरून अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले आहेत. अशा प्रकारचे राजकारण फक्त मुघलशाहीत होत असे. राष्ट्रवादी काँग्रेस हे एकसंघ कुटुंब आहे. आम्ही पण अजित पवारांच्या भगिनी असून प्राप्तिकर विभागाने आमच्यावर देखील धाडी टाकाव्यात, असे थेट आव्हानही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले.
















