पुणे (वृत्तसंस्था) माझ्या बहिणींशी संबंधित संस्थांवर धाडी टाकल्या. त्यांचं लग्न झालं, सुखी संसार आहे. त्यांचा दुरान्वयेही राजकारणाशी संबंध नाही. ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. याचं मला वाईट वाटतं. तसेच इतक्या खालच्या पातळीवरच राजकारण होतं आहे, हे वाईट आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांचे संचालक असलेल्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. दौंड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे जवान सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, आयकर विभागाने कुठे छापेमारी करावी हा त्यांचा निर्णय आहे. माझ्या संबंधित असलेल्या कंपन्यांचे सर्व कर वेळेवर भरले जातात.
मी स्वत: अर्थमंत्री असल्यानं याची काळजी घेतो. आता ही रेड इन्कम टॅक्स विभागाने राजकीय हेतूपोटी टाकली याबाबत तेच सांगू शकतील. माझ्या नातेवाईकांच्या संबंधित कंपन्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. आता ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. याचं मला वाईट वाटतं, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारच्या पोलिस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू आहे. केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून धाडीची कारवाई सुरू केली आहे. जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती आहे. तर अंबालिका साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जंगल वाघ यांच्या काटावाडीतील घरी तपास यंत्रणा पोहोचल्या आहेत. जंगल वाघ हे काटावाडीतील अजित पवारांच्या घराजवळच राहतात.